शेळीपालन यशोगाथा 4

मित्राने दिलेला शेळीपालनाचा सल्ला लातूर येथील मोहसीन शेख यांनी अभ्यासातून अंमलात आणला. आधुनिक शेड व्यवस्थापन, खाद्य, पोषण, स्वच्छता, लसीकरण आदी विविध घटकांवर काटेकोर लक्ष देऊन शेळीपालन व्यवसाय वाढवला. त्यातून आर्थिक विकास शक्‍य करून दाखवला. व्यवसायाच्या मार्केटिंगसाठीही त्यांनी कुशलता दाखवली. आज परराज्यातील ग्राहक त्यांच्याकडे शेळ्यांची मागणी करण्यासाठी येऊ लागले आहेत.

मोहसीन युनुसमियॉं शेख हे लातूरचे. त्यांची काही शेती नव्हती. मात्र आपले मित्र सय्यद जमिल यांनी त्यांना शेळीपालनाची वेगळी वाट दाखवली. या व्यवसायाचा अभ्यास व अर्थशास्त्र तपासून सन 2008 च्या सुमारास शेख यांनी उस्मानाबादी शेळीपालन व्यवसायाला सुरवात केली. यासाठी लातूरपासून काही किलोमीटरवरील नांदगाव शिवारात चार गुंठे जमीन मुबारक चाऊस यांच्याकडून कराराने भाडेतत्त्वावर घेतली, तर सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे शिवाजी शेंडगे यांच्याकडून चार गुंठे जमीन वार्षिक 20 हजार रुपयांने भाडेतत्त्वावर घेतली. सुरवातीला 50 शेळ्या व तीन बोकडांची खरेदी केली. लातूर येथे 20 तर वैराग येथे 30 शेळ्यांचे संगोपन सुरू केले. आज नांदगाव येथे 50 तर वैराग येथे 250 शेळ्यांचे पालन केले जात आहे. त्यासाठी आधुनिक पद्धतीच्या शेडची उभारणी केली आहे.

शेळ्यांचे व्यवस्थापन

शेडची रचना

आधुनिक व शास्त्रीय पद्धतीच्या आदर्श शेडवर शेळ्याचे आरोग्य अवलंबून असते. यासाठी आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शेड बांधला आहे. जमिनीवर 15 बाय 35 फुटांच्या अंतरावर फरशीचे बेड तयार केले आहेत. त्यावर साडेतीन फुटांवर लोखंडी अँगलचा वापर करून शेडची उभारणी केली. त्यामध्ये पंचिंग जाळी बसवून मजला तयार केला. यामुळे शेळ्यांना हवेशीर वातावरण, त्यांची विष्ठा व मूत्र खाली फरशीवर पडून शेड स्वच्छ राहते, तसेच शेळ्या व त्यांचे विष्ठा-मूत्र एकमेकांच्या संपर्कात येत नाहीत. यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ राहते.

शेडच्या आतील भागात चारा खाण्यासाठी मोठ्या शेळ्या व पिलांसाठी स्वतंत्र गव्हाणी केल्या आहेत. त्यांची विष्ठा व मूत्र वाहून जाण्यासाठी शेडला जाळीचा वापर केल्यामुळे शेडमध्ये स्वच्छता राहून शेळ्यांचे आरोग्य उत्तम राहते. शेडमधील दुर्गंधी जाण्यासाठी “व्हेन्टिलेशन’ची सोय करण्यात आली आहे. यामुळे आरोग्य संपन्न राहून शेळ्यांचे पोषण उत्तम होते.

शेडच्या तिन्ही बाजूंनी जाळीचा वापर केल्यामुळे शेडमध्ये हवा मोठ्या प्रमाणात खेळती राहते. पावसाळा, हिवाळा अथवा उन्हाळ्यात आवश्‍यकतेनुसार शेड झाकण्याची सोय केली असल्यामुळे शेळ्याचे संरक्षण उत्तम प्रकारे करता येते.

व्यवसायाचे स्वरूप व विस्तार –

खाद्य व्यवस्थापन – शेळ्यांसाठी सकस आहारावर भर दिला जातो. नांदगाव येथील शेतीत एक एकरात मेथी घास, मका आदींची लागवड केली आहे. शेळ्यांना दिवसातून तीन वेळा खाद्य दिले जाते. पौष्टिक खाद्यात भरडलेला मका, शेंगदाण्याची पेंड, हरभरा व तुरीचा भुस्सा व खनिज मिश्रण दिवसातून एक वेळ दिला जातो. सकाळी हिरवा चारा, दुपारी विविध पौष्टिक खाद्य, सायंकाळी वाळलेला चारा तर रात्री हिरवा चारा असे खाद्य दिले जाते. हिरवा चारा व वाळलेल्या चाऱ्याचे तुकडे करण्यासाठी कडबाकुट्टी यंत्राचा वापर केला जातो. यामुळे चाऱ्याची 50 टक्‍क्‍यांपर्यंत बचत होते.

स्वच्छतेला प्राधान्य दिले जाते. शेडच्या बाहेरील बाजूला शेडनेटचा वापर करून सावली तयार केली आहे. पाणी पिण्यासाठी स्वतंत्र गव्हाणीची बांधणी केली आहे. शेळ्यांना हव्या त्या वेळी पाणी पिता येते.

2) पीपीआर, आंर्त्रविषार, लाळ्या खुरकूत, फऱ्या व घटसर्प या रोगांसाठी वर्षातून एक वेळ लसीकरण केले जाते. 3) पोटातील जंतुनाशक औषध वर्षातून दोन वेळा पाजले जाते.
4) तीन महिन्यांपर्यंत पिलांचे काळजीपूर्वक संगोपन केले जाते. थंडी, पावसाळा यांच्यापासून विशेषतः त्यांचे संरक्षण केले जाते.

मार्केट, विपणन व विक्री

शेख यांनी उस्मानाबादी गोट डॉट कॉम हे संकेतस्थळ 2012 मध्ये सुरू केले. यामुळे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, छत्तीसगड, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश व केरळ या राज्यांत ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला. सध्या ग्राहकवर्ग 80 टक्के परराज्यातील असून, तिकडे शेळीची ही जात उपलब्ध नसल्याने दरही चांगले मिळतात. सध्या मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या “सोशल मीडिया’चाही वापर केल्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक व बाजारपेठ शोधणे व ग्राहकवर्ग तयार करणे सोपे गेले.

सहा लाख रुपये गुंतवणूक करून 50 शेळ्यांपासून सुरू केलेल्या व्यवसायात आज शेळ्यांची संख्या तीनशेपर्यंत पोचली आहे. 130 पिले आहेत. महिन्याला सरासरी 30 ते 35 शेळ्यांची विक्री राज्यातील व परराज्यातील ग्राहकांना केली जाते. विक्री वजनानुसार होते. मोठी शेळी (35 ते 65 किलो वजन) 200 रुपये प्रति किलो तर बोकड 250 रुपये किलो दराने विक्री केली जाते. ग्राहकांच्या मागणीनुसार पिलांची विक्रीही महिन्याला सुमारे 30 च्या आसपास होते. जमीन भाडे, खाद्य, लसीकरण, औषधे असा सुमारे साडे 55 हजार रुपये खर्च होतो. सहा कर्मचारी असून त्यांचा वेगळा पगार असतो. लेंडी खताचा वापर चारा पिकांच्या शेतीत केला जातो. पिले मोठी झाल्यानंतर विक्री होत असल्यामुळे त्यांनाही चांगला भाव मिळत आहे.
पुरस्काराने सन्मान

जिल्हास्तरीय आदर्श शेळीपालक पुरस्कार फेब्रुवारी 2014 मध्ये शेख यांना प्राप्त झाला. त्यांच्या उत्कृष्ट उस्मानाबादी शेळी व्यवसायाची दखल घेत राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले यांनी त्यांच्या फार्मला भेट देऊन कौतुक केले आहे व आपल्या अधिकाऱ्यांनाही त्याबाबत सांगितले आहे.

जोखीम काय आहे?

शेख म्हणतात, की पिलांच्या मरतुकीचा मोठा धोका असतो. हिवाळा, पावसाळ्यात त्यांची फार काळजी घ्यावी लागते. त्यासाठी आरोग्य, खाद्य, पाणी, शेड व्यवस्थापन व स्वच्छता या गोष्टींवर मी काटेकोर भर देत असल्याने माझ्याकडे मरतुकीचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

संपर्क : मोहसीन शेख- 9890856194

लेखक : दीपक क्षीरसागर

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

Posted from WordPress for Android

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s